पारंपरिक घोंगडीची उब हरवली !
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व धार्मिक वैभवाचे प्रतिक असलेल्या घोंगडीला देवघरात स्थान असुन पुर्वी दिवंगत अभिनेते दादा कोंडके यांनी ” काठी नं घोंगडं घेवु द्या किरं मला बी जत्रला येवु द्या की ” चित्रपट गीतातून घोंगडीचे तत्कालीन सामाजिक जीवनातील महत्त्व रेखांकित केले होते.अशा या लोकवैभवाची साक्ष देणा-या घोंगडीची उब हरवत चालली आहे.
प्रत्येकाला हवी हवीशी वाटणारी काळीभोर घोंगडी ही कांबळी,कांबळा या नावाने प्रसिद्ध असुन धनगर समाजात या कांबळीचा ध्वज ही वापरल्या जातो.काठी कांबळीच्या नावानं चांगभलं म्हटल्या जाते.पंढरीच्या पांडुरंगाच्या खांद्यावर,भगवान श्रीकृष्णाच्या खांद्यावर दत्तप्रभुंच्या खांद्यावर, नवनाथांच्या अंगाखांद्यावर,खंडोबा,खेलोबा, बिरोबा,सिध्दनाथ, महालिंगराया,विठ्ठल बिरदेवाच्या खांद्यावर देखील घोंगडी असुन दोन रेघी,अडीच रेघी,तीन रेघी,साडेतीन रेघी घोंगड्या वापरण्याची पध्दत व परंपरा धनगर जमातीमधील गुरुशिष्य परंपरेत आढळून येते अतिशय पवित्र स्थान घोंगडीला असुन धनगर जमातीची नैसर्गिक ओळख ही घोंगडीतून निर्माण झालेली आहे.
घोंगडी निर्मितीचा इतिहास प्राचीन असुन महाभारतातुन या घोंगडीचा संदर्भ मिळत असल्याची माहिती घोंगडीचे अभ्यासक सचिन शेळके यांनी दिली आहे. घोंगडीबद्दल ज्यांना माहिती आहे ते नेहमीच घोंगडीचा वापर करतात मात्र काही लोक वेगवेगळ्या कारणांसाठी घोंगडी वापरण्याचा विचार करुन घोंगडी खरेदी करतात. घोंगडी ही काळ्या आणि पांढऱ्या या दोन रंगाच्या लोकरीपासुन तयार केली जाते यात घोंगडीची प्रतवारी केलेली असुन खळीची घोंगडी ही अंथरण्यासाठी करतात काही लोक झोपण्यासाठी नेहमीच घोंगडीचा वापर करतात तर काही लोक हिवाळ्यात थंडीपासून बचावाकरिता घोंगडीचा वापर करतात. द-याखो-यात रानोमाळ मेंढरं राखणारे मेंढपाळ उन वारा पावसापासून बचावाकरिता नेहमीच घोंगडीचा वापर करीत असतात मुसळधार पावसात घोंगडीचे उभे घोंगटे करुन मेंढपाळ बांधव अथवा जंगलात राहणारे बांधव आपला बचाव करतात. नैसर्गिक उब मिळत असल्याने प्रत्येकाच्या घरात घोंगडी असतेच.
जावळाची घोंगडी
मेंढराच्या कोकराच्या पहिल्या कातरणीपासुन मिळणाऱ्या लोकरीस जावळ म्हणतात या जावळापासुन तयार होणाऱ्या घोंगडीस जावळाची घोंगडी म्हटल्या जाते जावळाच्या घोंगडीत दोन तीन प्रकार आढळून येतात यात सर्वात बारीक विणकाम असलेली घोंगडी मऊ असते ती अंगाला टोचत नाही शिवाय तिचा वापर शाँलप्रमाणे पांघरण्यासाठी करतात या घोंगडीला तयार करण्यासाठी चार पाच दिवस आणि जास्त मेहनत लागत असल्याने किमंत जास्त असते.
याचप्रमाणे मध्यम आणि जाड लोकरीच्या सुतापासुन घोंगडी तयार केली जाते या तीन प्रकारच्या घोंगड्या लोक पांघरण्यासाठी करतात सध्या या घोंगड्या हातमागावर तयार करण्याचे काम माणदेशातील म्हसवड सह कर्नाटकातील चित्रदुर्ग,कोकण पट्टीत तुरळक ठिकाणी केले जाते.जावळाची लोकर मर्यादित असल्याने घोंगड्याही मर्यादित तयार होतात.जावळाची घोंगडी महाग मिळते त्यामुळे स्वस्त मिळते म्हणून जावळाच्या नावाखाली पानिपत पध्दतीची मऊ व स्वस्त घोंगडी घेवून फसगत करुन घेवू नये.दोन अडीच हजाराची पारंपरिक घोंगडी तुमचे लाखो रुपये बचत करणारी ठरु शकते.
खळीची घोंगडी
घोंगडी तयार करतांना चिंचोक्याच्या खळीचा कमी
अधिक प्रमाणात वापर केल्या जातो चिंचोक्याच्या खळीपासुन तयार केलेल्या घोंगडीला खळीची घोंगडी म्हणतात ही घोंगडी कडक असते अगदीच स्टार्च कपड्या सारखी.काळ्या,पांढ-या तसेच काळ्या पांढऱ्या एकत्रित लोकरीपासुन खळीची घोंगडी तयार केली जाते ही घोंगडी अंथरण्यासाठी वापरली जाते.
खळीच्या पाण्यात भिजवून ही घोंगडी तयार केली जाते.
वरिल दोन्ही प्रकारच्या घोंगड्या या पारंपरिक पध्दतीने हातमागावर विणकाम करुन तयार केल्या जातात.
मशीनमेड घोंगडी.
लोकरीच्या सुताचा धागा तयार करुन यात अजून दुसरे सुत मिक्स करुन घोंगडी तयार केली जाते ही घोंगडी वजनदार असते लोकांना पारंपरिक घोंगडी वापरतांना लोकरीचा त्रास वाटतो म्हणून ते बाजारात मिळणाऱ्या स्वस्त मशीनमेड घोंगडीचा वापर करतात यात 60%लोकर व 40% इतर सुत असते.या घोंगडीला काळी अथवा पांढरी करण्यासाठी रंग दिल्या जातो.कालांतराने या घोंगड्या आपले मुळ स्वरूप दाखवतात.
पानिपत घोंगडी
अनेक चित्रपट तथा धार्मिक टीव्ही चँनलवर भागवत, रामायण कथा सांगणा-या महाराजांच्या खांद्यावर घोंगडी असते ती मऊ घोंगडी म्हणजेच पानिपत शाँल होय.हरियाणा राज्यातील पानिपत मध्ये मोठ्या प्रमाणावर घोंगडी सारखी हुबेहूब दिसणारी शाँल तयार केली जात असुन हजारो लोक घोंगडी समजून ही शाँल खरेदी करीत असतात.लोकरीची घोंगडी ही खरखरीत व मऊ तसेच उबदार असते घोंगडीला धुतल्या जाते ती मातीने चिखलाने खराब होत नाही कोणत्याही ऋतूत घोंगडी वापरल्यास शारीरिक फायदा मिळतो.तर पानिपत शाँल ही दिसायला आकर्षक व सुबक असुन घोंगडीसारखी तयार केली गेली आहे.
महात्मा गांधींनी स्वदेशीचा नारा देत खादीला राष्ट्रीयत्व प्राप्त करुन दिले मात्र खादी तयार करणाऱ्या चरख्यावरच लोकरीच्या सुतापासुन तयार होणाऱ्या घोंगडीला कुणी राजाश्रय मिळवून देण्याचा प्रयत्न केला नाही. हंटर कमिशनला सामोरे जातांना महात्मा फुलेंच्या खांद्यावर घोंगडी होती. याच घोंगडीने इंग्रजाचे लक्ष वेधून घेतले होते दरम्यान बेळगावात तयार होणारी हातमागावरील घोंगडी इंग्रजांनी ब्रिटनला पाठवली होती.मराठ्यांच्या इतिहासात देखील मोठमोठ्या मोहिमांवर जातांना प्रत्येकाजवळ एक घोंगडी असायची अशी ही घोंगडी यांत्रिकीकरणाच्या काळात लुप्त होतांना दिसून येत आहे. घोंगडी आणि घोंगडी विणकरांच्या कष्टाला योग्य प्रतिष्ठा मिळत नसल्याने भारतीय संस्कृतीचे वैभव सांगणारी घोंगडी अडगळीत पडत असुन या घोंगडीला पुन्हा एकदा वैभव प्राप्त करून देण्याची आवश्यकता आहे.
– रामभाऊ लांडे अंबड